Moral Stories in Marathi

संत नामदेव कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक

संत नामदेव (इ.स. १२७० - इ.स. १३५०)

संत नामदेव कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक

संत नामदेव (इ.स. १२७० – इ.स. १३५०)

संत नामदेव  हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. संत नामदेव मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
संत नामदेव हे मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी “नर्सी” या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
“भक्तशिरोमणी संत नामदेव” हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज, नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपूरात गेले. त्यांनी लहानपणा पासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शिख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’ अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात.
पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांका विषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. सत नामदेव हे आपल्या कीर्तनाच्या मध्यमातून भारतभर फिरले.

गृहजीवन

नामदेवांच्या घराण्यात विठ्ठलभक्त्ती पूर्वापार चालत आली असल्यामुळे अगदी बालपणापासून त्यांना विठ्ठलभक्त्तीचा छंद जडला होता. अर्भकावस्थेतच बोलण्याचा प्रारंभ `विठ्ठल विठ्ठल’ अशा नाममंत्राने झाला. अशा तऱ्हेने नामदेवांचे विठ्ठलप्रेम लहानपणापासून दुथडी ओसंडून बाहात होते. पांडुरंग मूर्तीला ते पाषाणमूर्ती न समजता साक्षात आनंदघन मानीत. या बालभक्त्ताच्या प्रेमपाशात तो आनंदघन पूर्णपणे गोवला गेला होता. या संदर्भात नामदेवांच्या बालपणीची एक आख्यायिका संगतात ती अशी,
नामदेवांच्या वडिलांचा असा एक नेम होता की, दररोज पूजा करून पांडुरंगाला ते नैवेद्य दाखवीत असत. एक दिवस दामाशेटीला कामाकरिता बाहेरगावी जावयाचे होते. म्हणून त्यांनी नामदेवाला देवळात जाऊन पूजा करावयास व नैवेद्य न्यावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले व नैवेद्य खाण्याविषयी त्यांनी देवाची हात जोडून प्रार्थना केली. पण देव नैवेद्य खाईना. नामदेवांनी पुन्हा देवाला प्रार्थना केली,
“देवा, तूं जर आज नैवेद्य खाणार नाहीस, तर मी येथुन हालणार नाही.”
असे बोलून ते तेथेच बराच वेळ बसले. भगवंतांनी नामदेवांची परीक्षा पाहाण्याचे ठरविले. बराच वेळ झाल्यावर नामदेव देवाला म्हणाले,
“विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन.”
जरा वाट पाहून देव नैवेद्य खात नाही असे पाहाताच नामदेव डोके आपटणार तोच भक्त्तवत्सल भगवंताने त्यांना धरले व नैवेद्य आनंदाने खाल्ला.
नामदेवांचे जुने-नवे चरित्रकार वरिल अलौकिक घटनेचा निर्देश करीत आले आहेत. ही घटना जरी चमत्कारपूर्ण मानली गेली असली, तरीसुद्धा या प्रकरणावरून बालनामदेवांच्या भोळ्या, श्रद्धाळू मनाचे दर्शन होते आणि या घटनेच्या प्रकाशात त्यांच्या भावी जीवनात क्रमशः घडलेल्या इतर घटनांचा अर्थ समजून घेण्यास मनाची तयारी होते.
हा बालभक्त्त सर्वकाल पांडुरंगाच्या भक्त्तीत दंग असे. हे पाहून दामाशेटी व गोणाई चिंतातुर झाली. नामदेवाने संसाराकडे लक्ष द्यावे व उद्योगधंदा करावा ही त्यांची इच्छा. म्हणून त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गोविंदशेट यांची मुलगी राजाई हिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले. तिच्यापासून नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल हे चार मुलगे व लिंबाई नावाची एक मुलगी अशी पाच अपत्ये त्यांना झाली. अशा प्रकारे नामदेवांचा संसार, कुटुंबाच्या गरजा, त्यांचा आईच्या आशाआकांक्षा वाढत चालल्या. याउलट, नामदेव संसाराविषयी विरक्त्त वाढतच चालली.
एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी नामदेवांनी घ्यावी असे कुटूंबातील मंडळींना वाटे. पंरतु त्यांना विठ्ठलाचाच एकमेव ध्यास होता. त्यामुळे घरच्या मंडळींना प्रपंच आवरणे कठीण झाले.
नामदेव विठ्ठलमंदिरात जात. तेथेच नामस्मरण करीत. विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आपले हितगुज सांगत. आपणच देव आणि आपणच नामदेव अशा प्रकारे संभाषण करीत. एकदा गोणाई स्वयंपाक करून नामदेवांची वाट पहात बसली, पण नामदेवांचा काही पत्ता नाही. तेव्हा संतापाने अगदी लाल होऊन त्यांना पाहण्याकरिता ती देवळाकडे गेली. तेथे पाहते तो नामदेव जणू काय चित्रातील पुतळ्यासारखे देवापुढे उभे. रागाच्या भरात तिने त्यांना हाताने ओढले मात्र, तोच ते प्रेतासारखे जमिनीवर धाडकन्‌ पडले. त्याची ही अवस्था पाहून त्या प्रेमळ माऊलीचा राग जागच्याजागी जिरला. अंतःकरण गहिवरून आले. त्यांना पोटाशी धरून ती रडू लागली. नामदेवांनी सावध होताच तिला प्रेमलिंगन दिले, पण लागलेच ते तिला म्हणाले, “आई, मी विठ्ठलाच्या ध्यानात मग्न असता, तू त्याची आणि माझी अशी ताटातूट केलीस म्हणून तू माझी आई नव्हेस.” गोणाई म्हणाली, “नामदेवा, अरे काय म्हणतोस हे ?
नऊ महिनेपर्यत पोटात वागवून तुला लहानाचा मोठा केला, तो एवढ्याकरिताच काय ? अरे बाबा, या विठोबाचा नाद सोड. याने कधी कोणाचे बरे केले नाही. आपला संसार बुडवू नकोस. काही परक्रम करून जन्माचे सार्थक कर. लौकिकाची काही चाड धर शिवण्या-टिपण्यावर तू पाणी सोडलेस. घराकडे ढुंकून पाहात नाहीस. ही तुझ्या भक्त्तीची तऱ्हा तरी कोण बाबा?”
नामदेव ऐकत नाही, असे पाहून गोणाईने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळविला. ती म्हणाली, “विठ्ठला, आम्ही तुझी काडीचीही ओशाळी नसता, तू माझ्या मुलाला असा अगदी वेडापिसा करून का सोडलास? बऱ्या बोलाने माझे पोर माझ्या स्वाधीन कर, याच्या हातात भोपळा देऊन तू आम्हांला मात्र भिकेची पाळी आणलीस? कसली रे मेल्या तुझी दया? हे पाहा, “एकतर मी जीव मी देईन, किंवा माझा नामा नेईन” हाच माझा निश्चय. अहो राही रखमाई, तुम्हाला साक्ष ठेवून मी सांगते की, मी नामा नेईन.”
आईचे हे बोलणे ऐकून नामदेव म्हणाले, “आई, पुढे काही लाभ होईल या आशेने तुम्ही मला पांडुरंगाच्या चरणापासून दूर ओढता, पण जन्ममरणाच्या दुःखाने होरपळून गेलेल्या माझ्या मनाचा नुसता विचारही तुमच्या मनात येत नाही, याला काय म्हणावे? तुम्ही सारी माणसे माझ्या सुखाचे वाटेकरी आहात, दुःखाचे कोणी वाटेकरी होत नाही. म्हणूनच मी पांडुरंगाचे पाय धरून सर्वस्वी त्याचा झालो. तो माझे विश्रांतिस्थान आहे. त्याचे गुणगान करण्यात मला आनंद वाटतो. आई, मी तुला माझ्या अगदी मनातील गोष्ट सांगतो, माझ्यावर जे तू एवढे कायावाचामनाने प्रेम करतेस, तेच प्रेम श्री विठ्ठलाच्या ठिकाणी कर, म्हणजे तो तुला केव्हाही अंतर देणार नाही.” गोणाईला अर्थातच हा उपदेश खपला नाही. शेवटी रागाच्या भरात नामदेवाची व विठ्ठलाची मनसोक्त्त निर्भर्त्सना करून ती म्हणाली, “नामदेवा, तुज नेल्यावांचून नथ जाय येथून / पंढरी गिळीन विठोबा सहित //
आपल्या उपास्यदेवतेची यापेक्षा अधिक निंदा नको, असा विचार करून नामदेव आईबरोबर घरी निघुन गेले. गोणाई-नामदेवांचा हा संवाद करुनरसपूर्ण आहे. वैतागाच्या भरात गोणाई कधी मर्यादा सोडून बोलते, कधी देवाला बोल लावते,”माझे बाळ कां केले वेडे वतुझे काय खादले” असे म्हणून त्याच्याशी भांडते. देवाने संसार बुडविला म्हणून त्याच्यावर चिडते, तरी तिच्या साध्या भोळ्या करुण वाणीत आईची माया आहे, पुत्राविषयीची कळकळ आहे व विठ्ठलावरील विरोध-भावनेतून व्यक्त्त होणारे प्रेम आहे,
मी एक आहे तंव करीन तळमळ / मग तुझा सांभाळ कोण करी? //जरी जालासि शहाणा तरी माझें लेंकरुं / माझा वेव्हारु विठ्ठलासी // नामदेवांचा नित्यक्रम चालूनच होता. तो सुटावा म्हणून गोणाई प्रमाणेच दामाशेटी आणि राजाई यांनीही त्याची पाठ पुरविली. त्यांच्या वडिलांना हा नित्याचा विठ्ठलछंद पसंत नव्हता. ते नामदेवांना म्हणत,
“नामदेवा, शिवण्या-टिपण्याचा व्यवसाय करून प्रपंच चालविणे हा आपला कुलधर्म. गणगोतात तू चांगलाच लौकिक कमावलास, अरे तुला ही कसली भूल पडली? विठ्ठलाच्या ठिकणी तुला एवढे कसले सुख लाभले? तुझा देव पाहावा तर धडफुडा आणि तूं त्याचा निधडा भक्त्त, खरोखरी एकमेकांना तुम्ही चांगले शोभता, तुझ्याविषयी केवढ्या आशा मी ऊराशी बाळगल्या होत्या ! माझे आयुष्य आता संपत आले आहे. थोडेच दिवस उरले आहेत. आमच्या पश्चात तू नावलौकिक राखशील असे वाटले होते, पण तू तर चांगले दैव काढलेस. “खांद्यावर भोपाळा काय घेतोस? रामकृष्णाचा जप काय करतोस? अरे, नाम्या तू सर्व लोकलज्जा सोडलीस आणि कुळाला कलंक लावलास.”
दामाशेटीचे हे बोल कडक वाटतात. त्यांच्या वाणीत उपरोधाबरोबर निर्भर्त्सनाही आहे. नामदेवांनी संसारात लक्ष घालावे म्हणून त्यांची पत्नी राजाई हिने त्यांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. तीही उद्वेगात म्हणे, *“तुमची आई तुम्हाला शिकविते ते तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला लौकिकाची भीती व लाज वाटत नाही. लंगोटी लावून गोसावी झालात खरे, पण आमची उठाठेव कोण करणार? तुमची ही विरक्त्त स्थिती पाहून मला काळजी पडली आहे. बळेच आपण वेड कशाला लावून घेता? कंटकमय परिस्थिती झाली खरी. गोकुळासारखा संसार, तोही उजाड केलात व जगात नावलौकिक वाढविलात. मायामोहाच्या बेड्या तोडल्या पण ही मोहिनी तुमच्या मनाला कोणी हो घातली?
सर्वस्वाचा त्याग केलात नि देव जोडला. त्यानेच माझ्या संसाराचा नाश केला. तुम्हाला माझी दया का येत नाही? माझी सासू तर भोळीभाबडी. त्यांनी पांढय्रा स्फटिकासारख्या माझ्या पतिरायाला जन्म दिला. त्यांनी भगवंताला वश केले. आता मी काय करू?” राजाईला शेवटी आपल्या पतीची आध्यात्मिक योग्यता व सामर्थ्य पटले. पश्चात्तापाने ती म्हणते, “मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा / अपराध क्षमा करा माझा // अंतरींची खूण कांहीं सांगा मज / जें तुम्ही बीज हदयी धरूनि असां // जेणें सुखें तुमचें चित्त निरंतर ।। आनंदें निर्भर सदा असे //”
नामदेवांच्या चरित्रात असे सरस व भक्त्तिरसाने भरलेले अनेक प्रसंग आहेत. आपली जीवनविषयक भूमिका नामदेवांनी आत्मचरित्रात विस्ताराने सांगितली आहे. त्यात पारमार्थिक साधने करीत असता काय काय अडचणी आल्या, कौटुंबिक अडथळे कसे सहन करावे लागले, इत्यादींचे सुंदर निरूपण नामदेव व त्यांची आई गोणाई यांचा संवाद, ते व त्यांचे वडील दामाशेटी, नामदेव व त्यांच्या पत्नी राजाई यांचा संवाद यात तटस्थ वृत्तीने केले आहे.
आरंभी नामदेवांच्या विठ्ठलभक्त्तीला विरोध करणारे हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठलाच्या भक्त्तिप्रेमात पुढे रंगून गेले, विलीन झाले हे नामदेवांनी स्वीकारलेल्या भाक्त्तिमार्गाचे फार मोठे यश आहे. नामदेवांनी ही आत्मकथा अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीच्या उत्कट भाषेत सांगितली आहे. प्रापंचिक साधकांना या आत्मकथेचा फार उपयोग होतो व नामदेवांच्या गृहजीवनाचीही त्यावरून चांगली ओळख होत.

ज्ञानेश्वर भेट व गुरूपदेश

नामदेवांच्या जीवनात अत्यंत मह्त्ताची घटना म्हणजे नामदेव व ज्ञानदेव यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग. या भेटीच्या काळाचा अंदाज ज्ञानदेवांच्या परंपरेतील चवथे उद्‍बोधनाथ यांनी लिहिलेल्या ज्ञानदेव चरित्रातील भिंत चालविल्याच्या प्रसंगाच्या कालनिर्देशावरून करता येतो , “भानू शत भानू रची ज्ञानेश्वरी / विकृत संवत्सरीं ज्ञानरूप // त्याच शकीं रिपु म्हैसा बोलविला / चालवि भिंतीला वसू माजी //” यावरून शके १२१२ च्या कार्तिक महिन्यात निर्जीव भिंतीस चालवून तापीतीर निवासी सिद्ध चांगदेवास सामोरे जाण्याची आज्ञा ज्ञानदेवांनी त्या भिंतीस केली. त्यानंतर चांगा वटेश्वरांनी ज्ञानदेवांच्या प्रेरणेने मुक्त्ताईचा अनुग्रह घेतला. या अनुग्रहानंतर नामदेव-ज्ञानदेवांची भेट झाली, असे निवृत्तिनाथादी संत व मुक्त्ताबाई यांच्यात झालेल्या संवादावरून म्हणता येते. “नामदेवांचा जन्म शके ११९२, म्हणजे या भेटीच्या वेळी त्यांचे वय २० वर्षाचे होते. हे भेट शके १२१२ च्या कर्तिक महिन्यानंतर आळंदी येथे झाली असावी.”
लहान वयातच आवंढ्या नागनाथाच्या देवळात नामदेवांना “संसार’ झाला तोकडा, ……..प्रेमें केला वेडा पांडुरंग” अशी त्यांची स्थिती होती. हळुवार मनाच्या त्या अवस्थेत पांडुरंगाची सगुण मूर्ती हेच परब्रह्म. त्याच्या व्यतिरिक्त्तदेव नाही, अशी सगुण मूर्तीच्या स्वरूपाचा ध्यास घेऊन तळमळत राहणाय्रा नामदेवांची ठाम समजूत होती. या एकविध अंधश्रद्धेला धक्का देण्याच्या उद्देशानेच, “नामदेवा देवे सांगितलें कानीं / संतांचे दरुशनी जावे तुवां // ”
अशी देवाकडून प्रेरणा मिळाली व ते निवृत्तिनाथादी भावंडांच्या दर्शनाला आळंदीस आले. “पंढरीचा प्रेमा घरा आला” म्हणून निवृत्तिनाथ नामदेवांच्या चरणी लागले. आपणच विठ्ठलाचे गाढे भक्त्त असा अहंकार नामदेवांच्या चित्तात दडला होता. तो यावेळी बाहेर पडला. ते म्हणाले, “आम्ही देवाच्या सान्निध्यात सतत आहोत. मग यांच्या चरणवंदनाची आम्हांस आवश्यकता काय?” यानंतर ज्ञानदेवांनी त्यांना नमस्कार केला. “यांच्यापेक्षा वयाने वडील असल्याने यांना आम्ही वंद्य”, असे म्हणून नामदेव स्तब्ध राहिले. सोपानदेवांनी नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या ठिकाणी मानून श्रद्धापूर्वक नमन केले. त्यांनाही नामदेवांनी प्रति नमस्कार केला नाही. या गोष्टीतील मर्म मुक्त्ताबाईच्या मनोमन ध्यानात आले. ती मूळचीच सडेतोड. नामदेवांना वंदन करण्याचे तिने साफ नाकारले. उलट तिने प्रश्न केला, “अखंड जयाला देवाचा शेजार / काय अहंकार गेला नाहीं // मान अभिमान वाढविसी हेवा / दिस असतां दिवा हातीं घेसी / परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ / आंधळ्या डोहळे कां बा जाले // कल्पतरु तळवटीं इच्छिल्या त्या गोष्टी / अद्यापि नरोटी राहिली कां //” पण निवृत्तिनाथांनी मुक्त्ताबाईला दटावले, “ऐसे न म्हणावे बाई”, परंतु तिची कुजबूज चालूच होती. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे लागली म्हणून का त्यांच्यात गोडी येणार ? विठ्ठलाच्या सहवासात असला म्हणून का नामदेवाचा कोरेपणा जाणार आहे.? चंदनाचे झाड खर, पण अहंकाररूपी सापाने ते वेढलेले आहे.
भक्त्तीचा बोलबाला केला नि अहंकार खुंट वाढविला. गुरुशिवाय कोरडाच. या सज्जनांनी त्याला चांगदेवासारखे भाजून पक्के करावे. कुंभार आव्यात मडकी भाजतो, त्याप्रमाणे याला भाजून काढा आणि पावन करून आपले ब्रीद खरे करा. गोरोबा काकांना बोलवा. संतपणात हा पक्का झाला का कोरा आहे, यासंबंधी त्यांच्याकडून परीक्षा करून निर्णय घ्या नामदेवासारखा भक्त्तराज आपल्या संप्रदायात नाही म्हणून निवृत्तिनाथांचाही जीव कासावीस होत होता. “ऐसे गुंफेमध्ये नाहीं नामदेव / म्हणूनी माझा जीव थोडा होतो //”
भक्त्तिसामर्थ्याने देवाला वश करणारा हा भक्त्त आपल्या संप्रदायात यावा हीच तळमळ निवृत्तिनाथांच्या शब्दांत व्यक्त्त झाली आहे.
यानंतर योगिनी मुक्त्ताबाई योगसामर्थ्याने गोरोबाच्या भेटीस गेल्या. ही भेट कशी झाली याचे वर्णन ज्ञानदेवांनी नाथसांप्रदायाच्या सांकेतिक भाषेत केले आहे.
“मुक्त्ताईने सोहंध्वनी करताच आकाशात मोत्याचा चुरा फेकावा आणि विजेचा प्रकाश दिसावा तसे झाले. जरतारी पीतांबरांनी आकाश झाकून टाकवे त्याप्रमाणे खालपासून वरपर्यत नीलबिंदु सागर, त्यावर नाचणारी सर्पाची पिले दिसू लागली. सर्वत्र शून्याकार झाले. कडाडून वीज चमकावी आणि आपल्याच ठिकाणी गुप्त व्हावी त्याप्रमाणे गोरोबास मुक्त्ताई भेटल्या.” या भेटीतून नामदेवांच्या भक्तीमधील अपुरेपणाचा निर्णय झाला आणि गुरूपदेशाचे महत्त्व प्रस्थापित झाले. गुरूपदेश घेतल्यानेच आपल्या ऊत्कट भक्त्तीला परिपूर्णता येईल असे यातून नामदेवांना समजून चुकले. विठ्ठलाच्या साक्षात्काराने त्यालाच अनुमती मिळाली.
गोपाळकाल्याच्या एका प्रसंगी निवृत्तिनाथ पंढरीस आले होते. तेव्हा नामदेव अंतर्मुख होऊन ईश्वरी प्रेमात तल्लीन झालेले त्यांनी पाहिले. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान यांना मिळालेल्या ब्रह्मबीजाची प्राप्ती खेचरनाथांकडून घेण्यास नामदेवांना विठ्ठलाने प्रेरणा दिली असे निवृत्तिनाथ म्हणतात. “न उघडितां दृष्टि नबोले तो वाचा / हरिरूपी साचा तल्लीनता // उठि उठि ते नाम्या चाल रे सांगातें / माझे आवडते जिवलगे // कुरवाळिला करें पुसतसे गुज / घेई ब्रह्मबीज सदोदित // ज्ञानासि लाघले निवृत्ति भावले / सोपाना घडले दिनरात // तें हें रे सखया खेचरासि पुसे / गुरुनामीं विश्वासें ब्रह्मरुपें // निवृत्ति म्हणे आता अनाथा श्रीहरी / तूंचि चराचरी हेचि खूण //”

संत नामदेव भारतयात्रा

ज्ञानदीप लावूं जगीं” या काव्यपंक्त्तीत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वरभक्त्तीच्या ज्ञानज्योतीवर असंख्य दीप उजळून मानवी उज्वल करण्याचे त्यांचे जीवनध्येय होते. ज्या शब्दांनी जनताजनार्दन डोलू लागेल, सर्वत्र प्रेमभाव वाढेल आणि आत्माज्ञानाचा दीप प्रज्वलित होईन असे साहित्य निर्माण करू अशी प्रेरणा, “बोलूं ऐसे बोल” या अभंगचरणात त्यांनी व्यक्त्त केली आहे. जनतेचा आध्यात्मिकदृष्ट्या विकास व्हावा हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे त्यांनी स्वतःच त्यांची भाषा प्रांतिक मर्यादेत अलिप्तपणे गुरफटलेली नाही.
भक्त्तिप्रचारासाठी त्यांनी त्या काळातील लोक-सरस्वतीत, म्हणजे हिंदी भाषेत रचना केली आणि आयुष्यभर भारतयात्रा चालू ठेवली. ते इतर प्रांतीय भाषा शिकले. महाराष्ट्रातून निघाल्यावर ते थेट दक्षिणेस म्हैसूर (कर्नाटकासह), तामिळनाड, रामेश्वरपर्यत गेले व उत्तरेकडे गुजरात, सौराष्ट्र, सिंधुप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश व पुन: पंजाबात भक्त्तिप्रचार करीत गेले. पंजाबी भाषेत त्यांनी पद्ये लिहिली. प्रांताप्रांतातील भाषा आत्मसात केल्या आणि त्यांचा उपयोग लोकजागृतीसाठी केला
दुसरी पदयात्रा त्यांनी दक्षिण भारतात केल्याची माहिती नवीन मिळालेल्या तीर्थावळीतील तीर्थयात्रेतील गावांच्या नावांवरून मिळते. श्रीशैलशिखर, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबर, विष्णुकांची, रामेश्वर, ताम्रपणिका, आळुवा, कन्याकुमारी, हरिहरेश्वर जनार्दन या तीर्थांच्या ठिकाणी शके १२१८ च्या सुमारास जाऊन नामदेवांनी भागवतधर्माचा, मानवधर्माचा प्रचार केला. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांतून विखुरलेल्या दर्जी, छिप्पिगा या अल्पसंख्य लोकांवर त्याचा प्रभाव पडला. तेव्हापासून ती अल्पसंख्य ज्ञाती आपणांस “नामदेव” म्हणवू लागली व मद्रास (तामिळ्नाडू) राज्यातील भूसागर व मल्ला या जाती “नामदेव” हेही आपल्या जातीचे समानार्थक नाव मानू लागले. यानंतर संपुर्ण भारतवर्षाची प्रदीर्घ यात्रा नामदेवांनी पायी केल्याची माहिती नवीन उपलब्ध झालेली आहे. ही यात्रा शके १२२० ते १२२६ या सहा वर्षांतील दिसते. वै. प्र. सी. सुबंध यांना पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात, शके १५०३ मध्ये लिहिलेले एक जुने हस्तलिखित मिळाले. हे तीर्थयात्रेचे टांचण चौदा अभंगांत आहे. त्यात नामदेवांनी सर्व भारताची जी पदयात्रा केली त्याचे वर्णन संक्षेपाने केलेले आहे. ही तीर्थयात्रा नामदेवांनी एकाच वेळी व एकटयानेच केली असल्याचेही दिसून येते. कारण इतर संत त्यांच्याबरोबर असल्याचा कोठेही उल्लेख नाही. या प्रदीर्घ यात्रेत नामदेव काही तीर्थक्षेत्रांत अनेक महिने रहात असत.
“आकल्‍प आयुष्‍य व्‍हावे तया कुळा । माझिया सकल हरिचिया दासा ॥”

The content on this website is for informational purposes only and may not be complete or accurate. We are not responsible for any actions taken based on this information; use it at your own risk. For any copyright issues related to this content, please email us at hello@wowbuzz.in.

Show More

Related Articles

Back to top button