भगवान आशुतोष महादेवांनी आज श्रीविष्णूदेवांना सुदर्शन चक्र प्रदान केले.
भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव हे सर्व विश्वाचे आराध्य दैवत! देव ,दानव, यक्ष, किन्नर , गंधर्व , मानव सारे प्राणीमात्र सर्वच देवाधिदेव महादेव यांना पुजतात .श्री विष्णू देव ही भगवान शिवशंकरांना नेहमीच पुजत आलेले आहेत
श्री विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले ?, याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते.
एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीदिवशी भगवान देवाधिदेव महादेव शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू कैलासाला आले होते. त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्णकमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला. आपल्या आराध्याला त्यांनी नमस्कार केला शिवस्तुती केली ,शिवाभिषेक करून जेव्हा विष्णूंनी भगवान शिवशंकरांच्या पूजेला आरंभ केला, तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी महादेव शिवांनी हजार कमलपुष्पांपैकी एक पुष्प कमी केले.
पूजनविधी पूर्णत्वाला जात असता विष्णुंना एक कमलपुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले, पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने ,राहीलेल्या एका कमळांऐवजी ‘कमलनयन ‘ कमलरूपी डोळा अर्पण करण्यास ते तयार झाले.पूजेमध्ये राहिलेली अपूर्णता करण्यासाठीची श्री विष्णूंची भक्ती पाहून भगवान परमेश्वर महादेव प्रकट झाले . भगवान शिवांना साक्षात समोर पाहून अर्थात श्री विष्णूंना आनंद झाला आणि ते कल्याणकारी शिवाची स्तुती करू लागले . ‘हे भगवत आशुतोष शिवशंकरा । त्रिजगतीचा स्वामी विश्वनाथा , कैलासपती पशूपती ‘विश्वंभरा , हे देवादिदेव कल्याणकारी महादेवा नमस्कार स्वीकार करावा!
अन्यन्यभावाने श्री विष्णूदेवांनी भगवान महादेवांपुढे नतमस्तक झाले. यावर प्रसन्न होत भगवान महादेव म्हणाले , ‘ आपल्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे ‘”
हवा तो वर मागून घ्यावा ”
श्रीविष्णुने भगवान शंकरांच्याकडे असलेले अमोघ असे सुदर्शन चक्र मिळावे अशी मागणी महादेवांच्या पुढे केली .
महादेव प्रसन्न वदने म्हणाले , ‘ या अस्त्राचा वापर संत , सत्य -सज्जनांच्या रक्षणासाठी , सत्यार्थ आणि सर्वप्राणीमात्रांच्या जीवन उन्नतीसाठीच करायला हवा . ‘
श्री विष्णूंनी मनोमन होकार दिल्यानंतर भगवान शिवांनी सुदर्शन चक्र श्रीविष्णूंना प्रदान केले
“जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद व माझा आशीर्वाद या चक्रामध्ये असेल” असे उमापती शिव वदले.
तेंव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले* अशी ही कथा प्रचलित आहे.
‘श्री विष्णूंनी ही शिवभगवानांची पूजा केलेला दिवस अतिशय पुण्यदायी ठरेल* ” असा आशिर्वाद प्रत्यक्ष कैलास पती भगवान महादेवांनी दिला आहे. ‘तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने मनःपूर्वक शिवाचे पूजन करेल, त्याला मोक्ष प्राप्ती होईल असा ही आशिर्वादही परमात्मा शिवांनी भक्तजणांना दिला आहे…..
🙏🚩 हर हर महादेव ! ॐ नमः शिवाय !….. ओम नमो भगवते वासुदेवाय